लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सहकारी बँकांकडील राजकारण्यांच्या वाटा रिझर्व्ह बँकेने बंद केल्या असल्या, तरी नियमातून पळवाट काढत आता डमी संचालकांचा शोध सहकार मुरलेल्या राजकारण्यांनी सुरू केला आहे. निकषात बसणारे किंवा त्याप्रमाणे शिक्षण देऊन तयार केलेले कार्यकर्ते आता सहकारी बँकांसाठी तयार केले जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे.
राज्यात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. सांगली ही सहकार पंढरी समजली जाते. येथील अनेक राजकारण्यांनी जिल्ह्यासह राज्याच्या सहकारी संस्थांचे नेतृत्व करून आपली छाप सोडली आहे. सहकारातून समृद्धीचा मंत्र अनेक जुन्या नेत्यांनी दिला, मात्र गेल्या काही वर्षांत स्वसमृद्धीचा मंत्र अनेक राजकारण्यांनी जपला. घोटाळ्यांमुळे सहकार क्षेत्र आणि अनेक राजकारणी बदनाम झाले. यात अनेक सहकारी बँका बंद पडल्या. अनेक अवसायनात निघाल्या.
रिझर्व्ह बँकेने सहकार शुद्धीकरणाची मोहीम यापूर्वीच चालू केली आहे, मात्र त्यांच्या या मोहिमेला कितपत यश येणार, याबाबत अद्याप साशंकता आहे. नागरी सहकारी व शहरी सहकारी बँकांवर आता आमदार, खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेतील, नगरपालिकेतील सदस्यांना संचालक होता येणार नाही. अन्य राजकारण्यांना या बँकांमध्ये यावयाचे असेल, तर शैक्षणिक पात्रता व अनुभव या स्तरावर सिद्ध करावे लागेल. ते सध्या शक्य नाही. त्यामुळे या राजकारण्यांनी आतापासून आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
चौकट
काय आहे युक्ती
यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले असले, तरी या महिला सदस्यांच्या माध्यमातून त्यांचे पतीच अप्रत्यक्ष कारभार करतात. तसाच फंडा आता बँकेच्या संचालक पदासाठी शोधण्यात आला आहे. मुलगा, मुलगी, पुतण्या आदी नातेवाईक तसेच निकटवर्तीय कार्यकर्त्यांना नव्या निकषात बसविण्यासाठी तयार केले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून पुन्हा आमदार, खासदारच बँकेचा कारभार पाहणार आहेत.
चौकट
जिल्हा बँकेत दिग्गज राजकारणी
जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वात मोठी सहकारी वित्तीय संस्था आहे. त्यामुळे याठिकाणी राजकारण्यांची संचालक पदासाठी चढाओढ असते. याठिकाणी एकूण लोकनियुक्त संचालक २१ असून, तज्ज्ञ संचालक २ आहेत. यात एक खासदार व ४ आमदार संचालक पदावर कार्यरत आहेत. राजकारण्यांची संख्या ९९ टक्के आहे.
चौकट
जिल्ह्यातील आकडेवारी
एकूण सहकारी संस्था ४,५०२
एकूण सहकारी बँका २३
जिल्हा सहकारी बँक १
नागरी सहकारी बँका २०
शिक्षक सहकारी बँक, अन्य बँका २