फोटो ०२ शीतल ०१
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणपती पेठमधील एक दुकान सील करण्यात आले, तर अकरानंतरही दुकाने सुरू ठेवल्याबद्दल सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
शहरात सकाळी ११ पर्यंतच अत्यावश्यक दुकानांना आणि भाजीविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शनिवारी अकरानंतरही अनेक आस्थापना आणि भाजी विक्री सुरू होती. सध्या शहरात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त कापडणीस यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मदतीने सांगली शहरातील व्यापारीपेठेत पाहणी केली. यावेळी शासनाच्या वेळेचे निर्बंध डावलून काही आस्थापना
सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे संयुक्त पथकाने सहा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. याचबरोबर गणपतीपेठेतील एक दुकानही सील करण्यात आले.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, वैभव कुदळे, गणेश माळी, किशोर कांबळे, राजू गोंधळे आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.