सांगली : राज्य सरकारने बाधित क्षेत्र नसलेल्या गावामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा आदेश दिला आहे; मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कायम आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नयेत, असा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत घेतला. ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली ७० टक्केपेक्षा कमी असलेल्या ग्रामपंचायतीवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत झाली. सरकारने बाधित क्षेत्र नसलेल्या गावामध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र सांगली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कायम आहे. जिल्ह्यात रुग्णांची वाढ सुरूच असल्याने या परिस्थितीत शाळा चालू करणे धोक्याचे आहे. महामारीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी सभेमध्ये सदस्यांनी केली. शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती आहे, त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचा कोणताही धोका पत्करण्यात येऊ नये, अशी मागणीही केली. कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नयेत, असा ठराव शिक्षण उपसंचालक व शासनाकडे पाठविण्याबाबत आदेश देण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली कमी आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांनी घर आणि पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले असल्याची कारणे ग्रामपंचायतींकडून दिली जात आहेत. शंभराहून अधिक ग्रामपंचायतीची वसुली कमी आहे. ज्या ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी वसुली ७० टक्क्यांहून खाली आहे, अशा ग्रामपंचायतींवर कलम ३९ (१) खाली कारवाई का करू नये, अशा नोटिस देण्यात याव्यात, असाही निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाकडील पशुसंवर्धन पायाभूत विकास निधीतून विकास कामे हाती घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कवठे महांकाळ तालुक्यातील कुंडलापूर येथील शाळेतून बोगस दाखला दिला असल्याच्या तक्रारीची शहानिशा करून बेकायदेशीर कृत्य केले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचनाही दिली. चोपडेवाडी (ता. पलूस) येथील २ शाळा खोल्यांच्या निर्लेखनास परवानगी देण्यात आली.
चौकट
मांगरुळ मॉडेल स्कूलची शाळा नादुरुस्त
शिराळा तालुक्यातील मांगरुळ येथील मॉडेल स्कूलची शाळा अत्यंत नादुरुस्त आहे. तेथील शाळा खोल्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन शाळा खोल्या घेण्याच्या सूचना प्राजक्ता कोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.