सांगली : महापौरपदाच्या शर्यतीत असलेले सांगलीचे नगरसेवक हारुण शिकलगार यांनी शनिवारी ‘विजय’ बंगल्यावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिकलगार यांचे पुत्र व त्यांचे कार्यकर्ते यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली. सुरुवातीच्या टप्प्यात शिकलगार यांनाच संधी मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. दुसरीकडे मिरजेचे सुरेश आवटी यांनीही जोरदार तयारी केली असून, १४ नगरसेवकांचा एक गट त्यांच्यासाठी कार्यरत झाला आहे. महापौरपदासाठी आता इच्छुकांनी रान उठविण्यास सुरुवात केली आहे. सांगली व मिरज असा वाद निर्माण करण्यात आला आहे. शहरांच्या नावावर संधीसाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी सकाळी शिकलगार यांचे जवळपास अडीचशे समर्थक कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर जमा झाले. त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत जयश्रीतार्इंची भेट घेतली. निष्ठावंत म्हणून शिकलगार यांना पहिल्या टप्प्यात संधी दिली जावी, अशी मागणी समर्थकांनी केली. योग्यवेळी बैठक घेऊन याविषयीचा निर्णय घेतला जाईल, असे जयश्रीतार्इंनी समर्थकांना सांगितले. दुसरीकडे सुरेश आवटी यांच्याबरोबर १४ नगरसेवकांचा गट आज कार्यरत झाला. पहिल्या टप्प्यात आवटींना संधी देऊन शेवटच्या टप्प्यात म्हणजे सव्वा वर्षाकरिता शिकलगार यांना संधी द्यावी, अशी मागणी या गटातील नगरसेवक करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही इच्छुकांच्या समर्थकांनी जोरदार फिल्डिंग लावली. दोन्ही इच्छुक आज महापालिकेत आले होते. काही सदस्यांशी त्यांनी चर्चा केली. दबावगट करून दावेदारी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. महापालिकेत सध्या महापौरपदाचे राजकारण रंगले आहे. (प्रतिनिधी) गणित संधीचे सांगली व मिरज शहराला किती वर्षे महापौरपद मिळाले, याचे गणित आता मांडले जात आहे. सांगलीतील नगरसेवकांच्या मते एकूण १७ वर्षात साडेदहा वर्षे मिरजेला, तर उर्वरित कालावधी सांगलीला संधी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सांगलीला संधी मिळावी, अशी मागणी शिकलगार समर्थक करणार आहेत. २१ रोजी बैठक शक्य महापौरपदाविषयी निर्णय घेण्यासाठी आ. पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्यात २१ जानेवारी रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
महापौरपदासाठी शिकलगार यांचे सांगलीत शक्तिप्रदर्शन
By admin | Updated: January 17, 2016 00:36 IST