सांगली : भिलवडी (ता. पलुस) येथील ग्रामपंचायतीवर बरखास्तीची चौकशीपूर्व घोषणा कशी केली, असा जाब विचारत सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांनी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत गुडेवार यांना धारेवर धरले. यावेळी गुडेवार यांचा आवाज चढल्यामुळे सर्व सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. दरम्यान, गुडेवार यांनी माफी मागितल्यामुळे वादावर पडदा पडला. जिल्हा परिषदेची बुधवारी सभा झाली.
भिलवडी ग्रामपंचायतीने दलित लोकसंख्या नसतानाही तेथे दलितवस्ती योजनेतील निधी खर्च केला, अशी तक्रार होती. या कामाची चौकशी करण्यापूर्वीच गुडेवार यांनी भिलवडी ग्रामपंचायत बरखास्तीची घोषणा केली. यामुळे ग्रामपंचायतीची बदनामी केली. जनतेचे मत बदलल्यामुळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. याला जबाबदार कोण? गुडेवार, भिलवडी ग्रामसेवकांवर कारवाई करा, असा सभागृहात ठराव मांडला.
संतप्त वाळवेकर यांनी गुडेवार यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय सभाच चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली. सर्वपक्षीय सदस्यांनी वाळवेकरांच्या मागणीला पाठिंबा दिला. तासभर गुडेवार आणि सदस्यांतील वाद चालूच होता. यावेळी गुडेवार यांचा आवाज चढल्यामुळे सदस्य अधिकच आक्रमक झाले.
अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुडेवार यांना सदस्यांची माफी मागण्यांची सूचना केली. त्यानुसार गुडेवार यांनी वाळवेकर यांची माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला. काही वेळानंतर सदस्यांनी गुडेवार यांच्या बदलीची मागणी केली.