मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूसह १३ जणांना अटक केली आहे. अॅपेक्समधील कोविड रुग्णांच्या मृत्यूच्या चाैकशीत सांगलीतील छातीरोगतज्ज्ञ डाॅ. शैलेश बरफे याने डाॅ. महेश जाधव यास मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने डाॅ. शैलेश बरफे यास चाैकशीस पाचारण केले होते.
चाैकशीला हजर न राहता डाॅ. बरफे याने डॉक्टरांच्या अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी डाॅ. बरफे याच्या जामीन अर्जास विरोध केल्याने अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला.
अॅपेक्सप्रकरणी आणखी एका डाॅक्टरला अटक करण्यात येणार असल्याने सांगली व मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अॅपेक्समध्ये कमिशनवर रुग्ण आणल्याबद्दल अटकेत असलेल्या तीन रुग्णवाहिका चालकांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.