सांगली : आठवड्यानंतर आज, मंगळवारी पुन्हा जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुके वगळता उर्वरित जिल्ह्याला दुपारी वादळी वार्यासह वळवाच्या पावसाने झोडपून काढले. पावसापेक्षा वार्याचाच जोर अधिक असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरे-गोठ्यांवरील पत्रे-कौले उडून गेली. विजेचे खांब वाकले, तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. जिल्हाभरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. सांगली शहरात चार ठिकाणी झाडे व फांद्या तुटून पडल्या. शास्त्री चौक, कोल्हापूर रस्ता येथे झाडे वाहनांवर पडल्याने मोटारीसह दुचाकीचे नुकसान झाले. जोरदार पावसाने ताकारी, किर्लोस्करवाडीदरम्यान रेल्वेमार्गावर झाडे पडल्याने यशवंतपूर-जोधपूर व सुवर्णजयंती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना तब्बल दोन तास विलंब झाला. खानापूर तालुक्यातील अनेक गावांना वार्याचा तडाखा बसला. लेंगरे येथे घराची भिंत कोसळून वृद्ध जखमी झाला, तर विट्यात आंब्याचे झाड तीन चारचाकी वाहनांवर पडल्याने नुकसान झाले. तेथेच नारळाच्या झाडावर वीज कोसळली. आळसंद येथे ५० केळीच्या झाडांचे वादळी वार्याने नुकसान झाले. कडेगाव तालुक्यातील कडेगाव, वांगी, चिंचणी, मोहित्यांचे वडगाव, देवराष्टÑे, शाळगाव परिसरात वादळी वार्यासह दमदार पाऊस झाला. मोहित्यांचे वडगाव येथे वादळी वार्याने जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून लाकडी खांब डोक्यात पडल्याने एकजण जखमी झाला. वार्यामुळे घरांचे पत्रे, कौले उडून गेली. शेळकबाव-वांगी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली. इस्लामपूर शहरासह संपूर्ण वाळवा तालुक्यालाही वादळी वार्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने थैमान घातले होते. घरांवरील पत्रे, कौले, शेतवस्तीवरील जनावरांचे गोठेवजा शेडही उडून गेले आहेत. वाळवा, पेठ, नेर्ले, कासेगाव, येलूर, कामेरी, येडेनिपाणी, ताकारी, बोरगाव, येडेमच्छिंद्र, बहे, गोटखिंडी, बावची, आष्टा, बागणी, कुरळप, ऐतवडे बुद्रुक या परिसरातही पावसाने हजेरी लावली. पलूस तालुक्यातील पलूस,अंकलखोप, औदुंबर, भिलवडीसह अनेक गावांत सलग दुसर्यादिवशी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. अंकलखोप परिसरात मुख्य विद्युत वाहिनीचे दोन खांब, कमी दाबाने विद्युत पुरवठा करणार्या वाहिन्यांचे १७ खांब मोडले आहेत. तासगाव शहरासह परिसरातहू मुसळधार पाऊस बरसला. सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या सरी कोसळत होत्या. कवठेएकंदजवळ झाडे पडल्याने तासगाव-सांगली रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, नागज परिसरासही पावसाने झोडपून काढले.
सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा
By admin | Updated: May 28, 2014 00:44 IST