सांगली : उसाची पहिली उचल २३00 रुपये जमा झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील आॅफिस काही अज्ञातांनी आज, शनिवारी पेटवून दिले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गेट केन आॅफिस पेटवून दिले.
उसाची पहिली प्रतिटन २३०० रुपयांची उचल शेतकऱ्यांना खात्यावर जमा केली. ही उचल एफआरपीप्रमाणे एकरकमी जमा करण्यात आलेली नाही. केवळ ८० टक्के रक्कम जमा केली आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे कारखानदारांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याप्रमाणे आंदोलन सुरु केले आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याचे घोगाव येथे विभागीय कार्यालय आहे.
शुक्रवारी मध्यरात्री या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्ला करुन ते पेटवून दिले. कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. कृष्णा कारखान्याचे रेठरेहरणाक्ष येथील कार्यालयही पेटवून दिले. यामधील टेबल, खुर्चा जळाल्या आहेत. कागदपत्रे टेबल ठेऊन जाळण्यात आली आहेत.
शनिवारी सकाळी कर्मचारी कार्यालय उघडण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे पलूस व इस्लामपूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची स्वच्छता करुन काम सुरु केले आहे. स्वाभिमानीने सुरु केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यात पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्तस्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेऊन पोलिसांनी जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने व त्यांच्या विभागीय कार्यालयांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. ऊस क्षेत्रातही बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. सर्वच कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने आंदोलनाचा पुन्हा भडा उडण्याची शक्यता आहे.