सांगली : केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीनही काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच महागाई रोखावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ मार्चच्या भारत बंदमध्ये काँग्रेस पक्ष सक्रिय सहभाग घेत दिवसभर उपोषण करणार आहे. सांगलीतही पक्षातर्फे उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असताना, मोदी सरकार मात्र कुंभकर्णाच्या झोपेत आहे. या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्ष सक्रिय पाठिंबा देत राज्यभर उपोषण करणार आहे. सांगलीतही शुक्रवार, २६ मार्च रोजी काॅंग्रेस भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत होणाऱ्या उपोषणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.