सांगली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिझेल रिक्षाने ठोकरल्याने महाविद्यालयीन तरुण गंभीर जखमी झाला. ओंकार मधुकर शिंदे (वय २३, रा. मंगळवार पेठ, मिरज) असे त्याचे नाव आहे. सांगली-मिरज रस्त्यावर चिंतामणराव व्यापार महाविद्यालयासमोर आज (मंगळवार) सायंकाळी हा अपघात झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ओंकार शिंदे याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात एमबीएच्या प्रथम वर्षात शिकतो. सायंकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर तो दुचाकीवरून (क्र. एमएच १० एसी ६८६७) बाहेर पडला. मोबाईलवर कॉल आल्याने तो रस्त्याकडेला थांबला होता. त्यावेळी सांगलीहून मिरजेला प्रवासी घेऊन निघालेल्या डिझेल रिक्षाने (क्र. एमएच १० के २२८८) त्याला जोराची धडक दिली. यामध्ये तो उडून पडल्याने जखमी झाला.अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली होती. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमी ओंकारला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी विश्रामबाग पोलिसांनी भेट दिली. प्रवासी घेण्याच्या जीवघेण्या स्पर्धेतून हा अपघात झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. फारुख शेख हा रिक्षाचा चालक आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रवासी घेण्याची स्पर्धासांगली-मिरज रस्त्यावर डिझेल रिक्षाचालकांत प्रवासी घेण्याची स्पर्धाच लागलेली असते. रस्त्यावर कुठेही ते प्रवासी घेण्यासाठी थांबतात. थांबताना ते रिक्षाचा इंडिकेटर लावत नाहीत तसेच हातही दाखवत नाहीत. अनेकदा त्यांच्यामुळेच अपघात झाले आहेत. वाहनधारकांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर रस्ता काय तुमचा आहे का? असे उत्तर देतात.
सांगलीत महाविद्यालयीन तरुणास रिक्षाने ठोकरले
By admin | Updated: November 11, 2014 23:16 IST