लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कुपवाड परिसरात घरफोडी व दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. आकाश सतीश कवठेकर (वय २४, रा. भारत सूतगिरणी, उमेदनगर, कुपवाड) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून दोन दुचाकींसह दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगलीत गस्तीवर असताना पथकास माहिती मिळाली की, कुपवाड रोडवरील भारत सूतगिरणी चौकात एक जण चोरीचे सोने कमी किमतीत विकण्यासाठी थांबला आहे. त्यानुसार पथकाने तातडीने तेथे जात संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनानंबरची दुचाकी होती, तर दुचाकीला पिशवी अडकवलेली होती. त्याने पोलिसांना सांगितले की, चार ते पाच दिवसांपूर्वी खोत चौक कुपवाड येथून मोटारसायकल चाेरली आहे, तर कुपवाड येथील एक बंद शेड फोडून लॅपटॉप व चार्जर चोरला. तसेच शिवशक्तीनगर कुपवाड येथील एक घर फोडून चोरी केली आहे. भारत सूतगिरणीजवळच्या एका इमारतीच्या पार्किंगमधूनही एक दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली.
कवठेकर याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, ६० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, १५ हजारांचा लॅपटॉप, १० हजार व ४५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, जितेंद्र जाधव, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.