लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुराच्या दणक्याने गारठलेल्या सांगलीकरांना सोमवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला. शहरातील पाणी तीन ते चार फुटांनी कमी झाले. शहरातील काही चौक, गल्ल्या व रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अजूनही मारुती चौक, टिळक चौक, जामवाडी, बायपास रस्ता, श्यामरावनगर या परिसरातील पुराची स्थिती कायम आहे.
सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराने वेढा दिला होता. नदीतील पाणी आता इंचा-इंचाने कमी होऊ लागले आहे. शनिवारी कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत गेली होती. रविवारी दिवसभर पाण्याची पातळी स्थिर होती. सोमवारी सकाळपासून मात्र महापूर ओसरण्यास सुरुवात झाली. दुपारीपर्यंत तीन फूट पाणी पातळी घटली होती. पुराचे पाणी ओसरू लागल्याने पूरग्रस्तांनाही थोडा दिलासा मिळाला. शहरातील शंभरफुटी, श्यामरावनगर परिसरातही पाणी एक फुटाने कमी झाले, तरी या परिसरातील पूरस्थिती अद्यापही कायम आहे. श्यामरावनगरचा संपूर्ण परिसर अद्यापही पाण्याखाली आहे.
आंबेडकर रस्त्यावरील पाणी आता झुलेलाल चौकापर्यंत मागे गेले आहे. झुलेलाल चौक, मुख्य बस स्थानक परिसरात दोन ते तीन फूट पाणी आहे. सिद्धार्थ परिसर, हरिपूर रोड हा भाग अजूनही पाण्याखाली आहे. हिराबाग कॉर्नरचा चौकातून पुराचे पाणी शिवाजी मंडईकडे सरकले होते. रिसाला रोडवरील भाजी मंडई पाण्याखाली आहे, पण तेथून पुढे मारुती चौक, मारुती रोड, हरभट रोड, टिळक चौकात आठ ते दहा फूट पाणी आहे. आझाद चौकातून पाणी स्टेशन चौकापर्यंत आले होते. राजवाडा चौक, महापालिका या परिसरात कमरेइतके पाणी कायम आहे. कापडपेठेतील रस्त्यावरील पाणी गेले आहे. गणपती मंदिराभोवतीचा पाण्याचा वेढाही सैल झाला होता.
जामवाडी, मगरमच्छ कॉलनी, सांगलीवाडी परिसरात अजूनही पुराची भीती कायम आहे. इस्लामपूर बायपास रस्त्यावरही पाणी असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. अजून दोन दिवस तरी हा रस्ता बंद राहणार आहे. आमराई रस्त्यावरील पाणीही सांगली हायस्कूलपर्यंत मागे गेले आहे. या परिसरातील रतनशीनगर, गोकुळनगर, टिंबर एरिया या परिसरातील रस्त्यावरील पाणी ओसरले आहे.
चौकट
पाणी ओसरलेली ठिकाणे
१. शिवाजी क्रीडांगणापासून ते आझाद चौकापर्यंतचा रस्ता मोकळा झाला.
२. शंभर फुटी रस्त्यावरील पाणी कोल्हापूर रोडपर्यंत गेले होते.
३. आझाद चौकातील पाणी स्टेशन चौकापर्यंत होते.
४. फौजदार गल्ली, श्यामरावनगरतील काही गल्ल्यांतील पूर ओसरला.
५. कत्तलखाना परिसरातील पुराचा जोर कमी.