लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : एव्हरेस्ट शिखर सर करणारे नवी मुंबईचे सहायक पोलीस निरीक्षक आणि पडवळवाडी गावचे पुत्र संभाजी गुरव यांचा सहकुटुंब सत्कार गावात करण्यात आला. सरपंच प्रमिला यादव यांनी एकाच मोठ्या पुष्पहारात सर्व कुटुंबीयांचा गौरव केला.
यावेळी त्यांच्या पत्नी सुजाता, वडील नारायण व बंधू शिवाजी गुरव, ग्रामपंचायत सदस्य माधुरी खोत, लता किरोलकर, कमल खोत, काशीनाथ माळी प्रमुख उपस्थितीत होते. ग्रामसेवक शीला थिटे यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य मारुती यादव यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच अतुल कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले.
संभाजी गुरव यांचे पेठ-सांगली मार्गावरील पडवळवाडी फाट्यावर आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सरपंच प्रमिला यादव यांच्यासह सर्व महिलांनी त्यांचे औक्षण केले. सवाद्य गावात आणण्यात आले. तिथे गावच्या भैरवनाथ नागरी पतसंस्थेच्या कृष्णा सपकाळ, गावांतील इतर संस्था पदाधिकारी यांनीही संभाजी गुरव यांचा सत्कार केला.