खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सलिमा शिकलगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नितीन पुजारी यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. सरपंच लता पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी तेरा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते; तर तीन सदस्य गैरहजर राहिले. उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी सलिमा शिकलगार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे, माजी सरपंच चंद्रकांत पुजारी, माजी उपसरपंच नितीन पुजारी, अर्जुन सावकार, दिलीप जानकर, जितेंद्र पाटील, विजयकुमार भांगे, सुभाष केंगार, मोहन शिंदे, विनोद पुजारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते. नूतन उपसरपंचांचा आमदार अनिल बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.