लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यात कोरोनाचा कहर ओसरू लागल्याने पूर्ण क्षमतेने एस. टी. बसेस शहरी भागात काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा एस. टी. बसला चांगला प्रतिसाद मिळत असून, जत आगाराचे उत्पन्न वाढत आहे. जत तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही बसफेरी सुरू नाही, त्या सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या व विस्ताराने मोठा तालुका आहे. जत तालुक्यात १२० गावे व २५०हून अधिक वाड्या-वस्त्या आहेत. ग्रामीण भागातील वाहतुकीसाठी एस. टी.ने फक्त उमदी व संख या गावांसाठी केवळ एक-दोनच फेऱ्याच सुरू केल्या आहेत. अन्य गावांच्या फेऱ्या बंद आहेत.
मागील काही दिवसांपासून एस. टी. बससेवा सुरू झाली. जत आगारातून दररोज शहरी भागात जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तासाला एक फेरी सोडण्यात येत आहे. या फेऱ्यांतून आगाराला चांगले उत्पन्न मिळत आहे. बससेवा सुरू झाल्याने विविध मार्गांवर प्रवासी वरचेवर वाढत आहेत. खरिपाची तयारी, बी-बियाण्यांची खरेदी, बाजारपेठा सुरू झाल्यानेही खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
चाैकट
अवैध खासगी वाहतुकीचा सहारा
आठवडा बाजाराच्या दिवशी गर्दी वाढत आहे. जत तालुक्यातील ग्रामीण भागात बसफेरी सुरू नसल्याने अवैध खासगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागत आहे. नागरिकांच्या सोयीकरिता ग्रामीण भागात एस. टी. बसफेरी सुरू करण्याची मागणी होत आहे.