लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील स्व. डॉ. नागेश पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी डॉ. रुपाली पाटील यांनी शेतमजुरी करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन मोठा आधार दिला आहे. त्यांनी वाळवा तालुक्यातील वाटेगाव, कासेगाव, नेर्ले, पेठ या गावातील मजुरांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाळवा तालुक्यातील वाटेगाव, कासेगाव, नेर्ले, पेठ या गावात अनेक मजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. या मोलमजुरी करणाऱ्या गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे गहू, तांदूळ, ज्वारीसह संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. पाटील यांनी ही मदत स्वत:च्या नावाची जाहिरातबाजी न करता पत्रकार विजय लोहार व कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजात एक आदर्श घालून दिला.