सांगली : सांगली शहर आणि उपनगरामध्ये रोज आठवडी बाजार भरत असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची सोय होत आहे. पण, आठवडी बाजार रस्त्यांवर घेतल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री होत असल्यामुळे त्यावर धूळ मोठ्याप्रमाणावर बसत असल्यामुळे आरोग्यासाठीही ते घातक आहे.
सांगलीतील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार दर शनिवारी भरतो. गुरुवारी चांदणी चौक आणि खणभागात रविवारी आठवडी बाजार भरतो. सांगली शहर आणि उपनगरामध्ये महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या भाजीपाला मार्केटची सोय उपलब्ध न केल्याने आठवडी बाजारादिवशी परगावाहून येणाऱ्या व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांचीही प्रचंड गैरसोय होती. शनिवारीचा आठवडी बाजार, तर शहरातील हरभटरोड, मारुतीरोड आणि राजवाडा चौक ते बसस्थानक रस्त्यावरच व्यापारी, शेतकरी भाजीपाला, कपडाबाजार, फळांची दुकाने यांसह इतर गृहोपयोगी साहित्याची हजारो दुकाने थाटली जातात. वास्तविक पाहता रस्त्याचा वापर करण्याचा हक्क वाहनचालकांचा आहे. त्यांना मात्र त्यादिवशी या गर्दीतूनच जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. शनिवारी रस्त्यावर थाटल्या जाणाऱ्या आठवडा बाजारांमुळे वाहनचालक व नागरिकांची परवड सुरू असतानाच सुसज्ज मार्केटअभावी भाजीविक्रेत्यांचाही मोठी गैरसोय होत आहे. बाजार संपला की टाकाऊ भाजी आणि भाजीचे करंडे बाजारपेठातील हमरस्त्यावरच टाकून भाजीविक्रेते काढता पाय घेतात. स्थानिक नागरिकांना दरुगधी आणि त्यापासून होणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागते.
गेल्या अनेक वर्षांपासून आठवडा बाजार भरत असतानाही ‘मार्केट’चा प्रश्न मात्र अद्याप मार्गी लागलेला नाही. दिवसेंदिवस वाढती नागरीवस्ती, रुंदावती बाजारपेठेची कक्षा आणि बाजाराची परिस्थिती आहे तीच अशी विदारक परिस्थिती सांगली शहरात आठवडी बाजारांमुळे पाहावयास मिळते. नागरिकांनाही रस्त्यावर बस्थान मांडलेल्या व्यापाऱ्यांकडून बाजार खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे ‘सारेकाही आलबेल आणि नागरिक हतबल’असे चित्र आठवडी बाजारातून पाहावयास मिळते.
हरभटरोडवरून सांगलीवाडी, आष्ट्याकडे प्रवासी जातात. शहर पोलीस चौकातून पलूस, कडेगावसह इस्लामपूरला जाणाऱ्या बसेसह मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणारी सर्व वाहने, तीन व सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. मात्र, बाजारा दिवशी बाजाराला जागाच नसल्याने त्या सर्वांना तेथून वाहने मिळेल त्या जागेत पार्क करावी लागतात. सगळीकडे त्यांचेच बस्तान असते. शेवटी नागरिकांनाच मिळेल तशी वाट काढत ‘बाजार’ करावा लागतो.
चौकट
मूलभूत सुविधासह भाजी मंडई करा
आठवडी बाजारात प्रसाधनगृहांची सुद्धा मारामार आहे. स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असून स्वच्छता व पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. या मूलभूत सुविधा आठवडी बाजारातून प्रति विक्रेत्यांकडून पाच ते दहा रुपयांप्रमाणे लाखो रुपयांचा कर गोळा करणाऱ्या महापालिकेने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आठवडी बाजार मोकळ्या मैदानात हालविण्यासह सुसज्ज भाजी मंडई शहरासह उपनगरामध्ये विकसित करण्याची भाजीविक्रेत्यांची मागणी आहे.