सदानंद औंधे
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत पावसाने शहरातील व विस्तारित भागातील रस्त्यांची दैना उडाली आहे. प्रमुख रस्त्यावरील खड्डे व चिखलातून ये-जा करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाने चार दिवसात महापालिकेच्या रस्त्यांची दुर्दशा केली आहे. महापालिकेने रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मिरज वैद्यकीय नगरीचा खराब रस्ते व खड्ड्यांबाबत लाैकिक होत आहे.
मिरजेतील छत्रपती शिवाजी रोड, वंटमुरे कॉर्नर ते स्टेशन चौक रोड, मालगाव रोड, टाकळी रोड या रस्त्यांवर पावसाने खड्डे पडले आहेत. शहरातील रस्तेही खराब झाले आहेत. अमृत जल योजनेसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आल्याने खोदलेल्या रस्त्यावर खड्डे व चिखल आहे. शास्त्री चौकातील रस्त्याच्या दुरुस्तीनंतर पुन्हा खड्डे पडत आहेत. खराब रस्त्यांमुळे प्रमुख चाैकात वाहतूक कोंडीची समस्या आहे.
शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम गेली दहा वर्षे रखडले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी २७ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार आंदोलने सुरु आहेत. या रस्त्यावर मुख्य बसस्थानक, शहरी बसस्थानक, लहान-मोठी रुग्णालये आहेत. पावसाळ्यात या रस्त्याचे पितळ उघडे पडले आहे. महापालिका स्थापनेनंतर २२ वर्षांत मिरजेतील रस्त्यावर शेकडो कोटी रुपये खर्च झाल्याची महापालिकेची आकडेवारी आहे. मात्र, शहरातील रस्ते अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
शहरातील प्रमुख मार्गावर खड्ड्यातून अवजड वाहने, ट्रक व ट्रॅक्टरची ये-जा असते. गांधी चौकासह अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडून खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. शहरातील पन्नास वर्षांपूर्वीचा रिंग रोड अरुंद असल्याने कर्नाटकात जाणारी वाहने शहरातून ये-जा करतात. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची पावसाने मोठी दुरवस्था झाली आहे. शहरालगत विस्तारित भागात गुंठेवारी भागात कच्च्या रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे अवघड झाले आहे. शहरालगत विस्तारित भागात व उपनगरातील कच्च्या रस्त्यांचे मुरुमीकरण रखडल्याने चिखलातून वाट काढणारे नागरिक महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करत आहेत.