फोटो ओळ : खिरवडे (ता. शिराळा) येथील जलसेतूजवळ रस्त्यावर प्लास्टिकचा कागद टाकून रस्ता झाकण्याचा प्रयोग केल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : ऐन पावसाळ्यात खिरवडे (ता. शिराळा) येथील जलसेतूजवळील रस्त्यावर ठेकेदाराकडून प्लास्टिकचा कागद टाकून रस्ता वाचविण्याचा केविलवाणा प्रयोग केला आहे. याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
पाचवड फाटा (कराड) ते कोकरूड फाटा दरम्यानच्या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षांपासून सुरु आहे. खिरवडे येथील वळणावर खुजगाव जलसेतूजवळ सध्या रस्त्याचे काम सुरु आहे. याठिकाणी एकेरी रस्ता केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु असून भर पावसातही या रस्त्याचे काम सुरू आहे.
या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. लवकरात लवकर काम उरकण्याच्या दृष्टिकोनातून ठेकेदाराने याठिकाणी भरपावसातच सिमेंट व ग्रीडमध्ये मिक्स केलेली खडी टाकून त्यावर रोलरच्या सहाय्याने रोलिंग केले आहे. रोलिंग केलेल्या खडीतील सिमेंट पावसाच्या पाण्याने धुऊन जाण्याची शक्यता असल्याने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी, या ठिकाणी अंदाजे वीस फूट अंतरावर प्लास्टिकचा कागद टाकला आहे.
सध्या शेवटच्या टप्प्यातील रस्त्याचे काम याठिकाणी शिल्लक राहिले असून मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कामात अडचणी येत आहेत. तरीही गुणवत्ता बाजूला ठेवून रस्त्याचे काम सुरू असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर करण्यात आलेल्या प्लास्टिक कागदाचा प्रयोग तपासून पाहावा त्याचबरोबर रस्त्याची गुणवत्ताही तपासून पहावी, अशी मागणी वाहतूकदार यांच्याकडून होत आहे.