लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत मार्केट यार्डातील होलसेल किराणा व्यापाऱ्यांना देण्यात आलेली सूट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासून पुन्हा एकदा मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प झाले असून, आपल्या गरजेनुसार दर दोन-तीन दिवसाला सामान विकत घेऊन त्याची विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे, तर रोजंदारीवर काम करून दररोज थोडक्या पैशातून किराणा सामान आणून घर चालविणाऱ्या सर्वसामान्यांचीही आबाळ हाेणार आहे.
जिल्ह्यातील लॉकडाऊन नियमावलीत बदल करताना प्रशासनाने बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मार्केट यार्डातील होलसेल किराणा माल व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापाऱ्यांना माल विक्रीस परवानगी दिली होती. मात्र, दुकानदारांसह सर्वसामान्यांनीही मार्केट यार्डात मोठी गर्दी केल्याचे सलग तीन दिवस चित्र होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गर्दी व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रविवारपासून घाऊक व्यापार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता, कडक निर्बंध अजूनही काही दिवस लागूच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किराणा, भाजीपाला, दूध आदी आवश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाच्या निर्णयानुसार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत किराणा दुकानदार ग्राहकांना घरपोच सेवा देऊ शकतात. मात्र, मार्केट यार्डातील होलसेल व्यापारच बंद झाल्याने आता या दुकानदारांकडेही मालाची उपलब्धता होणार नाही. सध्या उपलब्ध असलेला माल संपल्यानंतर ग्राहकांना माल पुरविणे शक्य होणार नाही. त्यामुळे सात ते अकरा अशी वेळ न देता किमात पाचपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे.
चौकट
वाढत्या गर्दीमुळे घेतला गेला निर्णय
मार्केट यार्डातील फक्त होलसेल किराणामालाच्या व्यवहारांना परवानगी देण्यात आल्यानंतर गर्दीचा अक्षरश: महापूर अनुभवास आला. पोलीस, महापालिकेच्या पथकाने याचे नियोजन करूनही संपूर्ण मार्केट यार्ड गर्दीने भरून गेले होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिकच वाढला होता. त्यामुळेच प्रशासनाने तातडीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांपेक्षा सर्वसामान्य नागरिकच होलसेल दुकानात खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून आल्याने गर्दी आटोक्यात असती तर सर्व व्यवहार सुरळीत राहण्यास अडचण नव्हती.
कोट
होलसेल व्यवहार बंद झाल्याने शहरातील गल्लीबोळातील सेवा देणाऱ्या दुकानदारांना माल मिळणार नाही. गेल्या ५० दिवसांपासून व्यवहार बंद असल्याने अगोदरच अस्वस्थता आहे. रोजंदारीवर असणाऱ्यांनाही अडचण येणार आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून परवानगी द्यावी.
अरुण दांडेकर, अध्यक्ष, किरकोळ किराणा भुसार विक्रेता संघ
कोट
प्रशासनाने अगोदरच वेळ कमी दिल्याने जिल्हाभरातून आलेल्या विक्रेत्यांना खरेदी करता येत नव्हती. आता पूर्ण व्यवहार बंद ठेवल्याने किरकोळ व्यापाऱ्यांसह घाऊक व्यापाऱ्यांनाही अडचणी येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो सर्वसमावेशक निर्णय घेऊन या घटकावरील अन्याय दूर करावा.
बाळासाहेब पाटील, होलसेल व्यापारी, सांगली
कोट
मार्केट यार्ड बंद झाल्याने लहान व्यापाऱ्यांचे व्यवहार पुन्हा थांबणार आहेत. उपलब्ध असलेला माल संपल्यानंतर त्यानंतर ग्राहकांना सेवा देता येणार नाही. घाऊक व्यापाऱ्यांनीही देशभरातून माल मागविलेला आहे. तो आता गुदामातच राहणार आहे.
रोहित हिडदुगी, होलसेल व्यापारी, सांगली