ओळ : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील बागरानकडे जाणाऱ्या पुलावरील महापुरात वाहून गेलेला रस्ता अमोल पाटील, प्रशांत पाटील, बाबूराव पाटील, हंबीरराव माळी यांच्यासह शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पुन्हा सुरू केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तीळगंगा ओढ्याला आलेल्या पुराने गावंधर मळा ते बागरानात जाणाऱ्या पुलावरील रस्ता भरावासह वाहून गेला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी जेसीबीच्या साहाय्याने पुलावर भराव टाकून हा रस्ता वाहतुकीस सुरू केला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतात येण्या-जाण्याचा प्रश्न सुटला आहे.
रेठरे धरण, मरळनाथपूर परिसरात २२ व २३ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. यामुळे रेठरेधरण येथील तीळगंगा ओढ्याला प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. येथील बागरानात जाणाऱ्या पुलावरील रस्ता भरावासह वाहून गेला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमाेर माेठा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच उद्योजक अमोल पाटील यांनी ओढ्यात पाणी असताना स्वतःचे पोकलँन मशीन पाण्यात घालून भराव वाहून गेलेल्या ठिकाणी दगड व मुरूम टाकून हा रस्ता पूर्ववत केला. यामुळे शेतकऱ्यांची गैरसाेय दूर झाली आहे.
चाैकट
लेंडूरी पूल, बनसाेडे वस्ती रस्त्याचीही डागडुजी
रेठरे धरण येथील लेंडूरी पूल ते महावितरणच्या सबस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भरावदेखील वाहून गेला होता. त्याठिकाणी, तसेच बनसोडे वस्तीकडे जाणाऱ्या पुलाजवळील रस्त्यावर अमोल पाटील यांनी स्वखर्चाने भराव टाकून रस्त्याची डागडुजी केली आहे.