सांगली : आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी दमदार पावसाने शेतकरी सुखावला होता, शनिवारी पावसाने भ्रमनिरास केला.
भारतीय हवामान खात्याने शनिवारी सायंकाळी दिलेल्या अहवालानुसार आगामी आठवडाभर जिल्ह्यात पावसाचा मुक्काम राहणार आहे. हा अंदाज खरा ठरावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शुक्रवारी दमदार पाऊस झाल्यानंतर शनिवारी सकाळी अचानक ढगांची दाटी कमी झाली. दिवसभर ऊन पडल्याने पावसाची ही विश्रांती चिंतेचे ढग निर्माण करणारी ठरली.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आठवडाभर पाऊस पडला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पुणे वेधशाळेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, मध्य महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळणार आहेत. भारतीय हवामान खात्याने मागील आठवड्यात दिलेल्या अंदाज शुक्रवारच्या पावसापुरता खरा ठरला. चार दिवसांचा अंदाज चुकीचा ठरला. आता नव्या अंदाजाप्रमाणे सरी बरसतील, अशी आशा आहे.