संख : प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीमध्ये त्या भागातील एका शिक्षक प्रतिनिधीचा समावेश करावा, अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे तत्कालीन गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल जत पंचायत समितीने घेतली असून, तसा ठराव मासिक बैठकीत सहमत केला आहे.
सध्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आरोग्यासाठी प्राथमिक शिक्षक आरोग्य यंत्रणेला सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहेत. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्य शिक्षणही द्यावे लागते. वेगवेगळे लसीकरण, गोळ्या व औषधे विद्यार्थ्यांना दिली जातात. त्याची माहिती सदस्य असल्यास प्राथमिक शिक्षकांना मिळू शकते. यासाठी प्राथमिक शिक्षकांना सदस्य म्हणून घ्यावे, अशी मागणी केली होती. आरोग्य समितीमध्ये शिक्षकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी सांगितले.