सांगली : घाटगे रुग्णालयातील कोविड सेंटरबाहेर परगावच्या नातेवाईकांनी दाेन दिवस पावसात रस्त्यावरच रात्र काढली. शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी आवाज उठविला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने याची दखल घेत, नातेवाईकांना रुग्णालयातील एक हॉल राहण्यास दिला.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एखादा नातेवाईक थांबून असतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक रुग्ण याठिकाणी दाखल झाले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड सेंटरमध्ये प्रवेश नसल्याने त्यांना रस्त्यावरच दिवस-रात्र थांबावे लागत आहे. रविवारी पावसात भिजतच नातेवाईकांना रात्र काढावी लागली. सुधार समितीचे शहराध्यक्ष महालिंग हेगडे व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी याप्रश्नी आवाज उठविला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना या प्रश्नाची कल्पना दिली.
आयुक्तांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत रुग्णालय प्रशासनाला वापरात नसलेला एखादा हाॅल नातेवाईकांना थांबण्यासाठी देण्याची सूचना केली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने एक मोठा हॉल नातेवाईकांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे नातेवाईकांना दिलासा मिळाला. त्यांनी सुधार समिती व आयुक्तांना धन्यवाद दिले.
सुधार समितीचे हेगडे म्हणाले की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या आयुक्तांना ही बाब आम्ही सांगितली. त्याची तात्काळ दखल घेऊन हॉस्पिटल प्रशासनाला आदेश देऊन नातेवाईकांना हॉल उपलब्ध करून दिला. त्यामुळे नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आणि आयुक्तांच्या तत्परतेमुळे हे सर्व घडले आहे. सांगलीमधील बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अशीच अडचण आहे. त्याठिकाणचा प्रश्न सोडविण्यासाठीही आम्ही पाठपुरावा करणार आहोत.