सांगली : जिल्हा कारागृहातील कैद्यांना गेल्या दहा महिन्यांपासून आपल्या नातेवाइकांना संपर्क करता आलेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने भेटी बंद केल्या होत्या. याबाबतची नियमावली अद्यापही कायम असल्याने कैद्यांना भेटी घेता येत नसल्याचे चित्र आहे. अपवादात्मक स्थितीत फोनवर संभाषण घडवून दिला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच गेल्यावर्षी सर्वच विभागातील प्रशासनाने काही नियम व निर्बंध लागू केले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या कारागृह प्रशासनानेही फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर नियम लागू केले होते. कारागृहातील कैद्यांची क्षमता व संख्येत मोठा तफावत असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी नातेवाइकांच्या भेटीवरही बंदी होती.
सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात आला असलातरी हे निर्बंध अद्यापही कायम आहेत. वरिष्ठ पातळीवरून अद्यापही संसर्ग टाळण्यासाठी हेच नियम कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा कारागृह व्यवस्थापन करत आहे.
चौकट
अपवादात्मक स्थितीत संवादाची संधी
नातेवाइकांना कारागृहात असलेल्या कैद्यांना भेटण्यास बंदी असलीतरी त्यांना कॉलच्या माध्यमातून संवाद घडविला जात आहे. त्यातही सर्वांना न देता आवश्यकता असलेल्या वेळीच ही परवानगी देण्यात येत आहे.
चौकट
साहित्यांचा पुरवठाही नाहीच
कारागृह प्रशासनाने केवळ भेटीगाठीच बंद ठेवल्या नाहीततर बाहेरून देण्यात येणाऱ्या वस्तूंही स्वीकारल्या जात नाहीत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अशी उपाययोजना असलीतरी थंडीमध्ये स्वेटर असो अथवा इतर वस्तू कैद्यांना पोहोच झाल्या नाहीत.
कोट
शासनाच्या निर्देशानुसार कारागृहात असलेल्या कैद्यांना भेटण्यास बंदी आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कैद्यांच्या आरोग्य योग्य राहण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनपातळीवरून कैद्यांना भेटीबाबत कोणताही आदेश आलेला नाही. वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात येत आहे.
सुशील कुंभार, जिल्हा कारागृह अधिकारी
चौकट
जिल्हा कारागृहातील आकडेवारी अशी
कारागृह क्षमता २३५
कैदी संख्या २८०