शिरटे : शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कऱ्हाड) येथील एका युवा शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. कृष्णाचे सभासद असणारे पांडुरंग काकासाहेब निकम या युवा शेतकऱ्याने जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून ८० गुंठ्यात तब्बल २११ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्याच्या या ऊसक्षेत्राला कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, या उद्देशाने डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून प्रतिएकरी १०० टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला असून, गेल्या ४ वर्षात या योजनेत ९ हजार ४९९ शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला आहे.
निकम यांच्या ऊस क्षेत्राची पाहणी डॉ. सुरेश भोसले यांनी केली. यावेळी ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कारखान्याने जयवंत आदर्श कृषी योजना आखली असून, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे. येत्या काळात सर्व शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करून, त्यांना कारखान्यातर्फे सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, समीर पाटील, अधिकराव निकम, शंकरराव निकम, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, सहायक शेती अधिकारी अजय दुपटे, अमोल साठे, विक्रम पाटील उपस्थित होते.
फोटो-03shirate01
फोटो
शेरे (ता. कऱ्हाड) येथील विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या ऊसक्षेत्राची पाहणी डॉ. सुरेश भोसले यांनी केली. यावेळी धोंडीराम जाधव, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, सूर्यकांत दळवी उपस्थित होते.