सांगलीत हनुमाननगर येथील महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात लस घेण्यासाठी सकाळपासून अशी गर्दी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : आरोग्य विभागासाठी रविवारचा दिवस अत्यंत धावपळीचा ठरला. जिल्हाभरात एका दिवसात विक्रमी संख्येने म्हणजे तब्बल २३ हजार ८३५ जणांनी लस टोचून घेतली. विशेष म्हणजे ग्रामीण भागात १९ हजार ३९७ जणांचे लसीकरण झाले.
रविवारीदेखील लसीकरण सुरू ठेवणार असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले होते, त्यामुळे बहुतांश केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी झाली होती. विशेषत: महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांत रांगा लागल्या होत्या. लाभार्थी नागरिक लसीच्या प्रतीक्षेत थांबून होते. त्याशिवाय जिल्हाभरातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांतही गर्दी होती. जिल्हा परिषदेकडे सुमारे ४० हजार लसी शिल्लक होत्या, त्यातून सकाळी मागणीनुसार ठिकठिकाणी लसी पाठविण्यात आल्या. आता अवघ्या सुमारे २५ हजार लसी शिल्लक राहिल्या आहेत, लसीकरणाचे प्रमाण पाहता त्यादेखील सोमवारी (दि. १२) संपण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने आणखी लसींची मागणी केली आहे. त्यानुसार पुरवठा झाला तरच मंगळवारी लसीकरण सुरू राहील, अन्यथा ठप्प होण्याची भीती आहे.
चौकट
रविवारी दिवसभरात झालेले लसीकरण
- प्राथमिक आरोग्य केंद्रे - १९ हजार ३९७- उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये - १ हजार ७१६
- महापालिका क्षेत्र - २ हजार ७२२
- जिल्हाभरात एकूण - २३ हजार ८३५