युनूस शेख-इस्लामपूर -कुंचल्याचे फटकारे मारताना स्वत: समुद्री शिंपल्यांच्या कोंदणात गाडून घेतलेला देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील हरहुन्नरी चित्र व शिल्पकार रवींद्र शिंदे कुंचल्यातून उमटलेली सागराची गाज अन् शिंपल्यांतून साकारलेली व अस्सल जिवंतपणाची अनुभूती देणारी शिल्पकृती घेऊन मुंबईच्या कलादालनात पहिलं पाऊल ठेवत आहे.मुंबईतील काळा घोडा चौकातील आर्टिस्ट सेंटरच्या आर्ट गॅलरीमध्ये १७ नोव्हेंबरपासून रवींद्र आपल्या प्रतिभेतून साकारलेल्या कलाकृतींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. विश्वजित कदम आणि स्वप्नाली कदम यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, अशी माहिती ज्येष्ठ चित्रकार अॅड. बी. एस. पाटील यांनी दिली.वडिलांच्या कोकणातील नोकरीमुळे रवीला लहानपणीच समुद्रकिनारा गवसला. मग त्याने डोळ्यात साठलेल्या या सागराची गाज, हवेचा बाज, झावळ्यांचा साज कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरवला. चित्रकलेतील रवीची आवड पाहून कुटुंबाने त्याला प्रोत्साहन दिले. त्यातून रवीने सांगलीच्या ‘कलाविश्व’मधून जी. डी. आर्ट आणि आर्ट टिचर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.
मुंबईच्या कलादालनात रवींद्र शिंदेचे पहिले पाऊल
By admin | Updated: November 14, 2014 23:22 IST