जत : जत तालुक्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ अखेर शासनाकडून शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.
शिधापत्रिका शोधमोहीम कालावधीत बी.पी.एल., अंत्योदय, अन्नसुरक्षा, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापनाकार्ड इत्यादी सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या शोधमोहिमेत तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी विहीत नमुन्यातील फॉर्म भरून आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे किंवा गावकामगार तलाठी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी गावात राहत असल्याचा पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, एलपीजी गॅसजोडणी क्रमांक, बँक पासबुक झेरॉक्स, विजेचे देयक, टेलिफोन/मोबाइल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड व तहसीलदार, जत यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादीच्या छायांकित प्रती जोडायच्या आहेत. पुरावा हा एक वर्षाहून जास्त कालावधीपेक्षा जुना असू नये. तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी विहीत नमुन्यातील फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून जमा करावीत. शिधापत्रिका शोधमोहिमेत नागरिक व स्वस्त धान्य दुकानचालकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.