कवठेमहांकाळ :
वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे दुर्मीळ खवले मांजर गायब झाले असून, त्याची तस्करी झाली की ते पळून गेले याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील वन्यप्रेमी व नागरिकांनी केली आहे.
कुकटोळी येथील कारंडे वस्तीवरील शुभम कारंडे यांच्या पोल्ट्रीजवळ गुरुवारी रात्री खवले मांजर निदर्शनास आले. ते पोल्ट्रीमध्ये गेले असता कारंडे यांनी पोल्ट्रीचा दरवाजा बंद केला. गावातील तरुण, नागरिकांना फोन केले. कारंडे वस्तीवर रात्री साडेनऊ वाजता बघ्यांची गर्दी झाली. गर्दीतील एकाने वनविभागाला कळविले. रात्री अकराला वनविभागाचे संजय चव्हाण व पांडुरंग कांबळे हे दोन कर्मचारी वस्तीवर पोहोचले. त्यांनी बाहेरूनच खवले मांजर पाहिले. कारंडे बाहेर गेले असल्याने पोल्ट्रीच्या दाराला कुलूप होते. यावेळी नागरिक उपस्थित होते. परंतु कर्मचारी सकाळी येतो म्हणून तिथून निघून गेले.
शुक्रवारी सकाळी वनविभागाचे कर्मचारी परत कारंडे यांच्या पोल्ट्रीवर आले तर त्या ठिकाणी मागील जाळे फाडून खवले मांजर गायब होते. तेथे रक्ताचे डाग व जाळी मारलेल्या भिंतीला भगदाड पडलेले दिसत होते.
याबाबत वनअधिकारी शिंदे यांना विचारले असता, ‘आम्हाला काही माहीत नाही, मांजर जाळे फाडून पळून गेले. आम्ही काय करू?’ अशी बेजबाबदारपणाची व उद्धट उत्तरे दिली.
गुरुवारी रात्रीच खवले मांजर ताब्यात घेतले असते तर ही वेळ आली नसती, अशी चर्चा आहे.
याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असून खवल्या मांजराची तस्करी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
चौकट
चीन व व्हिएतनाममध्ये तस्करी
खवले मांजर दुर्मीळ असून त्याची तस्करी चीन व व्हिएतनाममध्ये केली जाते. त्याच्या शिकारीवर बंदी आहे. त्याच्या खवल्यापासून दमा व संधिवातावर औषध तयार केले जाते. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.