कामेरी : अंधश्रध्देच्या नावाखाली समाजामध्ये चाललेल्या भोंदुगिरीवर प्रहार करणारे व स्त्रियांवरील अन्यायाविरोधात चिंतनशील लेखन करणारे राम पाटील हे जुन्या पिढीतील उपेक्षित लेखक आहेत. त्यांच्या ‘इस्टेट’ व ‘तू गाय मी वासरू’ या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी केले.कामेरी (ता. वाळवा) येथे स्वामी विवेकानंद सामाजिक संस्था व श्री शिवाजी वाचनालयाच्यावतीने आयोजित राम अण्णा पाटील यांच्या ‘इस्टेट’ या कादंबरीच्या व ‘तू गाय मी वासरू’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी लेखक राम पाटील म्हणाले, गेल्या ४१ वर्षांत जगातील कोणताही आवाज मी ऐकलेला नाही. केवळ वाचन व निरीक्षणाच्या जोरावर लेखन करुन स्वत:चे वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. हजार तलवारींपेक्षा लेखकाच्या लेखणीला अधिक धार असते. आजच्या तरुणांनी माहिती तंत्रज्ञानाच्या चंगळवादी जगात स्वत:ची वाट लावून घेतली आहे. त्यांनी वाचन संस्कृती जोपासावी.सिनेअभिनेते विलास रकटे, दि. बा. पाटील यांनी यावेळी दोन्ही पुस्तकांवर समीक्षणपर भाषण केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य रणजित पाटील, भगवान पाटील, संपतराव जाधव, आर. के. जाधव, सुभाष पाटील, आनंदराव जाधव, प्रा. संतोष पाटील, सरपंच अशोक कुंभार उपस्थित होते.शिवाजी वाचनालयाचे कार्यवाहक बाबासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वैजयंता पेठकर यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वामी विवेकानंद सामाजिक संस्थेचे संस्थापक गणेश कुंभार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
राम पाटील हे चिंतनशील लेखक
By admin | Updated: January 30, 2015 23:19 IST