श्रीनिवास नागे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यपाल नियुक्त आमदारकीवर फुली मारून राजू शेट्टी आता २०२४ मधील खासदारकीच्या मैदानात शड्डू ठोकणार आहेत. विरोधकाला धोबीपछाड देण्यासाठी कोणत्याही आखाड्याची लांग बांधण्याची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीशी अंतर राखत वाळवा-शिराळ्यातील भाजपच्या काही नेत्यांशी साधलेली जवळीक त्यांचे इरादे स्पष्ट करत आहे.
लोकसभेच्या २०१९ मधील मैदानात मातीला पाठ लागल्यानंतर शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हालचाली मंदावल्या होत्या. कोरोनामुळे चळवळीलाही खीळ बसली होती. यादरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र दीड वर्षापासून राज्यपालांनी त्या यादीवर सही केलेली नाही. सध्या कोरोनाची दुसरी लाट संपत आली आहे. ‘स्वाभिमानी’ने जिल्हाभरात आंदोलने, मोर्चे याद्वारे कार्यकर्ते क्रियाशील ठेवले आहेत. मात्र प्रत्यक्ष पद नसल्याने शेट्टींसह संघटनेची पिछेहाट होण्याची भीती दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा विषय झटकून टाकत लोकसभेच्या २०२४ मधील मैदानासाठी जोरबैठका सुरू केल्या आहेत.
लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेचे चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन मतदारसंघ (इस्लामपूर, शिराळा) येतात. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून शेट्टी लढले होते. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेने बाजी मारली होती. शेट्टी यांच्या पाडावासाठी भाजपनेच जास्त जोर लावला होता.
आता मैदानातील समीकरणे बदलली आहेत. भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला वेळ असला तरी आखाड्यात सरावाला जोर आला आहे. महाविकास आघाडीने एकत्र येऊन निवडणुका लढवल्या तर शेट्टी यांना आघाडीतून उमेदवारीचा दावा करता येणार नाही. कारण सध्या खासदार असलेल्या पक्षालाच तिकीट मिळण्याची शक्यता अधिक. त्यातच महाविकास आघाडीकडून शेट्टींच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यांनी कोणत्याही पक्षाची लांग बांधण्याची तयारी केली आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी इस्लामपुरात मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात शिराळ्यातील भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील सहभागी झाले आहेत. सध्या तरी भाजपच्या एका गटाशी शेट्टी यांची जवळीक दिसत आहे. कदाचित उद्या पुन्हा अख्ख्या भाजपशीच त्यांचा दोस्ताना होईल. शेट्टी यांचे ‘साध्य’ खासदारकीच असल्याने अशा साधनांची फिकीर ते कशाला करतील?
चौकट
तिकडे मोर्चा कोल्हापुरात, इकडे इस्लामपुरात!
राजू शेट्टी यांचे लक्ष्य सध्या हातकणंगले मतदारसंघच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सोमवारी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मात्र सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी इस्लामपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. इस्लामपूर, शिराळा मतदारसंघ समाविष्ट असलेल्या ‘हातकणंगले’वरच लक्ष केंद्रित केल्याचे हे द्योतक आहे.
चौकट
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र!
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. जे येतील त्यांना सोबत घेण्याच्या भूमिकेतून शेट्टी यांनी शिवाजीराव नाईक आणि निशिकांत पाटील यांना साथीला घेतले असले तरी त्याला भाजपमधील शीतयुद्धाची झालर आहे. भाजपमध्ये माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि महाडिक गट एकत्र आहे. खोत-महाडिक गटाचा शिराळ्यात नाईक गटाशी, तर इस्लामपुरात निशिकांत पाटील यांच्याशी सवतासुभा आहे. खोत हे शेट्टी यांचे कट्टर विरोधक. त्यामुळे ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या चाणक्य नीतीने शेट्टींनी नाईक-पाटील यांना सोबत घेतले आहे.