गव्हाण : तासगाव तालुक्यातील गव्हाण, वज्रचौंडे, अंजनी परिसरात मागील पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
गुरुवारी सायंकाळी पाचच्यासुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.
हा पाऊस खरीप पिकांना अत्यंत महत्त्वाचा होता. मागील पंधरा दिवसांपासून शेतकरीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. या परिसरात ज्वारी, बाजरी, भुईमूग, चवळी, मूग, उडीद पिकांची पेरणी झाली आहे.
तासगाव पूर्वभागात चार-पाच चांगले पाऊस झाल्याने ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी उरकली आहे. पावसाअभावी अजूनही १० टक्के पेरणी केली नाही. पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गव्हाण, अंजनी, नागेवाडी, वज्रचौंडे आदी गावांच्या परिसरात हजेरी लावली. पावसाअभावी तहानलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.