कुपवाड : शहरातील बजरंग नगरमधील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री कुपवाड पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चारजणांना ताब्यात घेतले असून, जुगारातील रोख रकमेसह २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
चंद्रकांत कल्लाप्पा मोदी (वय २३), सुनील मारुती खटके (वय २८), तौफिक मुजावर खान (वय २७, तिघेही रा. बजरंग नगर, कुपवाड), अहमद मकसूद खान (वय २६, रा. जकात नाका, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
बजरंग नगरमधील मोकळ्या जागेत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांना मिळाल्यानंतर उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, युवराज पाटील, सतीश माने, शिवाजी ठोकळ, इंद्रजित चेळकर, विजय गस्ते, सुरज मुजावर यांनी अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी चारही संशयित तीन पानी जुगार खेळताना रंगेहात सापडले. यावेळी पोलिसांनी जुगार अड्ड्यातील रोख रकमेसह २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.