इस्लामपूर : जिल्हाभरात स्थानिक पोलिसांचा डोळा चुकवून सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यांवर छापेमारी करण्याचे सत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. कवठेमहांकाळ, पलूसपाठोपाठ रविवारी इस्लामपूर शहरातील एका रमी क्लबवर छापा टाकून पोलिसांनी १५ दुचाकी आणि एक मोटार ताब्यात घेतली. मात्र संपूर्ण कारवाईबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.शहरातील इंदिरा कॉलनी परिसरात रमी क्लब सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्ह्याच्या अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या विशेष पथकाने हा छापा टाकला आहे. दुपारपासून ही कारवाई सुरू होती. पथकाने क्लबच्या परिसरात रमी खेळण्यासाठी आलेल्या संशयितांच्या १५ दुचाकी आणि एक मोटार ताब्यात घेतली होती. कारवाईतील इतर तपशील रात्रीपर्यंत समजू शकला नाही.क्लबवर रमी खेळण्यासाठी आलेले जवळपास ४० ते ४५ जण पथकाच्या हाती लागले आहेत. त्यात अनेक उच्चभ्रू व्यक्ती, शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. या छापेमारीत किती रकमेचा ऐवज पथकाच्या हाती लागला, याची माहिती मिळू शकली नाही. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती.
Sangli: इस्लामपुरात रमी क्लबवर छापा; उच्चभ्रू व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:44 IST