आटपाडी : इंधन दरवाढ व रासायनिक खतांच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन केले.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, देशात प्रचंड इंधन दरवाढ झाली आहे. गॅस, पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. महागाई भरमसाठ वाढलेली असताना केंद्र सरकारने सामान्यांना धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०.२६.२६ची किमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचे होते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजपच्या केंद्र सरकारने केले आहे.
याविरोधात येथील अण्णा भाऊ साठे चौक येथे केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी दत्ता यमगर, सादिक खाटीक, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, माजी पंचायत समिती सभापती विजयसिंह पाटील, विष्णुपंत पाटील, अनिता पाटील, अनिता कासार, राजेंद्र सावंत, देवीदास इंगवले, मदन जावीर, शहाजी भिसे, जालिंदर कटरे आदी उपस्थित होते.