लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मराठा आरक्षणप्रश्नी सांगलीच्या मारुती चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी ‘स्टॅण्ड फॉर मराठा रिझर्व्हेशन’ हा हॅशटॅग करीत डिजिटल व ऑफलाइन आंदोलन केले. आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याबद्दल काळे झेंडे दाखवित सर्वच पक्षांचा निषेध करण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मारुती चौकात येऊन संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकीय स्वार्थापोटी २०१४ मध्ये असंविधानिक राणे समितीच्या आधारे निवडणुकांपूर्वी न टिकणारे ईएसबीसी आरक्षण देऊन तत्कालीन आघाडी सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा अनादर केला. गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून टिकणारे आरक्षण देता येत असताना वेगळा प्रवर्ग करून न टिकणारे एसईबीसी आरक्षण देणारे युतीचे तत्कालीन फडणवीस सरकारनेदेखील मराठा समाजाचा अधिकार डावलला.
सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाच्या अहवालाची विस्तृत व अचूक मांडणी न करू शकलेले महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आरक्षण मिळवायच्या वाटा बंद केल्या आहेत. विद्यमान सरकार कोणत्याच प्रकारे मराठा समाजाला सहकार्य न करता मराठा समाजाचे शक्य तितके नुकसान करत आहे. समांतर आरक्षण, फी माफी, वसतिगृह, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ व २०१४ मधील खुल्या प्रवर्गातून निवडीकरिता पात्र असलेले उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थागितीपूर्वी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न असे कोणतेही मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यात महाविकास आघाडी सरकार व विरोधातील भाजपा अपयशी ठरली असून, मराठा समाजावर अन्यायच करत आहेत.
१०२ व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्य सरकारचा आरक्षण देण्याचा अधिकार काढून घेणारे केंद्रातील मोदी सरकारने देशातील नव मागास समूहांवर अन्याय केला आहे. राज्य शासन याबाबत योग्यवेळी कायदेशीर पूर्तता न करता राजकारण करण्यात व्यस्त आहे. समाज एकत्र आला तरच टिकू, अन्यथा आपल्या पुढच्या पिढ्यांची माती आपल्याच हाताने होईल, असे भावनिक आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.
आंदोलनात पृथ्वीराज पवार, ए. डी. पाटील, सतूश साखळकर, अविनाश जाधव, आनंद देसाई, विश्वजीत पाटील, चेतन माडगुळकर,चेतक खंबाळे, अभिजीत शिंदे, अमृतराव सूर्यवंशी, विशाल लिपाने पाटील, धनंजय शिंदे, प्रशांत भोसले, दादासाहेब यादव, राहूल पाटील आदी सहभागी झाले होते.