लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली येथील बायपास रस्त्यावर दुपदरी उड्डाणपुलाचे बांधकाम करावे तसेच सांगली ते अंकलीपर्यंतच्या अपूर्ण चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी काँग्रेस नेते व वसंतदादा साखर कारखाना अध्यक्ष विशाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पेठ नाक्यापासून सांगली शहरातून बायपासमार्गे मिरज म्हैसाळमार्गे रस्ता कर्नाटकात जातो. कृष्णा नदीवरुन बायपासमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर महापुराचे पाणी प्रचंड प्रमाणात पसरत जाते. त्यामुळे संपूर्णपणे पूर ओसरेपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद असतो. त्यामुळे इस्लामपूर, सातारा, पुणे, मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होते. शेती, उद्योग, व्यापार तसेच शैक्षणिक नुकसान प्रचंड होते. त्यामुळे लक्ष्मीफाटा ते टोलनाका, टोलनाका ते आयर्विन पूल,
टोलनाका ते शिवशंभो चौक ते माधवनगर रोडपर्यंतच्या रस्त्यावर दुपदरी उड्डाणपूल बांधणे गरजेचे आहे.
सांगली स्टँड ते अंकलीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे सध्या काम बंद आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर विभागामार्फत खासगीकरणाअंतर्गत सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणाचे काम निर्माण कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांचेकडे आहे. या रस्त्यावर कोल्हापूर, कर्नाटक, गोवा व इतर राज्यात जाणारी प्रचंड मोठी वाहतूक आहे. या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अनेक नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ चौपदरीकरण करावा. या दोन्ही रस्त्यांच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी विशाल पाटील यांना दिले.