सांगली : बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना मालमत्ता करात सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी लाभार्थींनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
राज्य शासनाने माजी सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार महापालिकेने या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. महाराष्ट्रात जन्मलेला आणि सलग १५ वर्षे रहिवासी असलेल्या माजी सैनिकाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेचा लाभ संबंधित माजी सैनिक व त्यांच्या पत्नी/विधवा हयात असेपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच अविवाहित शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आईवडील हयात असेपर्यंत ही सवलत सुरू राहणार आहे. त्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मंगलधाम संकुलातील महापालिकेच्या घरपट्टी विभागाशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.