विटा : शिवसेना हा जातीयवादी पक्ष नाही. जाती-पातीची दुकाने राष्ट्रवादी कॉँग्रेसने सुरू केली. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने लोकांची दिशाभूल केली, असा आरोप करून वसंतदादा पाटील हे प्रगल्भ राजकारणी होते. परंतु, वसंतदादांच्यानंतर राजकारणात व्यावसायिकता आल्याने संपूर्ण महाराष्ट्राची वाट लागली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी केली. वासुंबे (ता. खानापूर) येथे नवीन नळपाणी पुरवठा योजना व शाळा इमारतीचे उद्घाटन शिवतारे यांच्याहस्ते झाले. यावेळी आ. अनिल बाबर, सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, तानाजी पाटील, जि. प. सदस्य फिरोज शेख, बजरंग पाटील, अभिजित पाटील, दिनकर पाटील, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नीशादेवी वाघमोडे, साहेबराव पाटील, जहॉँगीर तांबोळी, बाळासाहेब होनराव उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, शिवसेना पक्षाच्या स्थापनेला शनिवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. विश्वासार्हता असेल तर लोकशाहीत काम करणाऱ्याला ताकद मिळते. खानापूर तालुक्यातील शेतकरी जिद्दी आहे. त्यामुळे टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी शिवसेना कटिबध्द राहील. टेंभू योजनेतून वगळलेली गावे योजनेत समाविष्ट करून घेण्यात येतील. वीज बिलासाठी योजना बंद पडल्या तर ३७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक खराब होईल. त्यामुळे दुष्काळी भागातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ, पुरंदर या योजना यशस्वीरित्या चालू राहतील. गेली १५ वर्षे सिंचनाची कोणतीही कामे झाली नाहीत. त्यामुळे ११ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ३७ हजार कोटी रुपयांवर गेल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अनिल बाबर म्हणाले, आमच्या दुष्काळी भागातील शेतकरी मेहनती आहेत. दुष्काळ पडला म्हणून ते कधीही खचून गेले नाहीत. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाल्यास शेतकरी सुखी होणार आहे. मला मंत्रीपदाची कोणतीही अपेक्षा नाही. फक्त शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभूचे पाणी मिळावे, टप्पा क्र. ४ व ५ ची कामे पूर्ण करावीत आणि सिंचन योजनांची वीज बिले कमी करून समान पाणीपट्टी आकारणीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत. या भागातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठीच माझी धडपड राहिल. उपसरपंच विकास पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुहास बाबर, तानाजी पाटील, दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास प्रसाद गायकवाड, रवींद्र पवार, सरपंच मालन पवार, दामोदर चव्हाण, उत्तम चोथे, दीपक माळी, सुशांत देवकर, कविता देवकर, राजेश कदम, शिवाजीराव शिंदे, डी. डी. कांबळे, टेंभू योजनेचे तानाजी झेंगटे, राजेंद्र शेंडगे, भरत पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आटपाडीचे तानाजी पाटील म्हणाले की, खानापूर मतदारसंघात विकास कामांचे अनेक नारळ फोडले आहेत, पण आता आम्हाला नाराज करू नका. आ. अनिल बाबर यांचा मंत्रिमंडळात समावेश करा. माजी उपसभापती सुहास बाबर म्हणाले, गेल्या दहा वर्षात टेंभूचा एकही दगड हलला नाही. मात्र, पंचायत समितीत कोळपी विकून विकास होतो का, अशी टीका केली, पण याच कोळप्यांनी अडीच वर्षातच ‘त्यांचे काम’ केले, अशी टीका माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे नाव न घेता केली. आटपाडी तालुक्यातूनही माझ्यावर टीका होत आहे. म्हणजे माझ्या कामाची दखल आटपाडीकरांनी घेण्यास सुरुवात केली असल्याचे सांगून खानापूरची काळजी तुम्ही करू नका त्यासाठी आम्ही समर्थ असल्याची टीका सुहास बाबर यांनी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यावर केली.
व्यावसायिक राजकारणाने महाराष्ट्राची वाट लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 00:49 IST