रजाअली पिरजादे : शाळगाव, एन. सी. डी. सी.चे संचालक, दुष्काळी फोरमचे नेते, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख लवकरच राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांना दोनवेळा आघाडी धर्म पाळण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे देशमुख यांनी विधानसभेच्या मैदानातून माघार घेतली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत शेतीपाण्याचा प्रश्न घेऊन देशमुखांनी कॉँग्रेसचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली. सलग १० वर्षे निवडणुकीच्या प्रवाहापासून चार हात लांब असलेल्या देशमुख यांनी ७० हजार मते घेतली होती. देशमुख यांना मिळालेल्या मतांमुळे कॉँग्रेसला आत्मचिंतन करावे लागले. मात्र आता विधानपरिषदेवर घेण्याचा पवार यांचा शब्द बाजूला पडल्याने देशमुख समर्थक, कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्ते पक्षबदलासाठी देशमुख यांच्यावर दबाव आणत आहेत. कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करून लढण्याचा निर्णय देशमुखांनी घेतला असल्याचे समजते. १९९५ मध्ये संपतरावअण्णा देशमुख निवडून आल्यानंतर त्यांनी मंत्रीपद नाकारून पाण्यासाठी युती सरकारला पाठिंबा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना कडेगावात आणून देशमुख यांनी टेंभू योजनेचे भूमिपूजन केले होते. संपतराव देशमुख यांच्या पश्चात शिवसेनेचे आणि संपतरावअण्णांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांचे घनिष्ट संबंध राहिले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांनी शिवसेनेत यावे म्हणून मनोहर जोशी यांनी शिष्टाई केल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांना विधानपरिषदेवर आणि अरुण लाड यांना पदवीधर मतदारसंघातून संधी देण्याचे मान्य केले होते. परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही म्हणून देशमुख व लाड यांच्यासह कार्यकर्ते नाराज आहेत. कडेगाव-पलूस मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शिवसेना कदम यांच्याविरोधात तगडा व मातब्बर उमेदवाराच्या शोधात होती. त्यातूनच देशमुख यांना शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे मान्य केल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते.
पृथ्वीराज देशमुख करणार राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’
By admin | Updated: July 7, 2014 00:37 IST