संख : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ११ नुसार सभासदांची कायम ठेव परत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. परंतु शिक्षकांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. सभासदांच्या मासिक कायम ठेवी परत कराव्यात, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे बँँक व्यवस्थापनाकडे केेली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, बँकेचे एकूण कायम सभासद सात हजार ४११ आहेत. प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा २१ मार्चला झाली. सर्वसाधारण सभेत विषय क्र. ११ नुसार सभासदांची कायम ठेव परत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभासद कायम ठेव मिळेल, या आशेवर असताना संचालक मंडळाने या निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.
सध्या कोरोना संकटाने काही सभासद शिक्षकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशावेळी बँकेने कायम ठेवी परत करून सभासदांना दिलासा द्यावा. ठेवी परत न करता सभासदांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे. या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करून कायम ठेवी परत कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.