Pradhanu Kalavishkar of Miraje, State Deities in the state drama, 'Deval' in Sangli | राज्य नाट्य स्पर्धेत मिरजेतील इंद्रधनु कलाविष्कार, सांगलीतील ‘देवल’चा गौरव
राज्य नाट्य स्पर्धेत मिरजेतील इंद्रधनु कलाविष्कार, सांगलीतील ‘देवल’चा गौरव


कोल्हापूर : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील सेलीब्रिटींच्या उपस्थितीत रविवारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाचा दिमाखदार सोहळा कोल्हापुरात रंगला. तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत विविध गटांत ‘सोयरे सकळे’, ‘अव्याहत’, ‘सवेरेवाली गाडी’, ‘संगीत संत गोरा कुंभार’, ‘वज्रवृक्ष’, ‘झेप’, ‘काऊमाऊ’ या प्रथम क्रमांक मिळविलेल्या नाटकांसह इतर विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मिरजेतील इंद्रधनु कलाविष्कारचा ‘वज्रवृक्ष’ राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच सांगलीतील देवल स्मारक मंदिरच्यावतीने सादर करण्यात ‘संगीत मंदारमाला’ यास संगीत नाट्यचे एक लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
केशवराव भोसले नाट्यगृहात पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते अरुण नलावडे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
पारितोषिक विजेते असे ....
व्यावसायिक नाटक : प्रथम क्रमांक : ‘सोयरे सकळ’ (भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबई-साडेसात लाख रुपये), द्वितीय क्रमांक : हॅम्लेट (जीगिषा व अष्टविनायक, मुंबई-साडेचार लाख), तृतीय क्रमांक आरण्यक (अद्वैत थिएटर, दादर-तीन लाख)
हौशी मराठी : प्रथम क्रमांक : अव्याहत (हंस संगीत नाट्य मंडळ, फोंडा-सहा लाख रुपये), द्वितीय क्रमांक : ºहासपर्व (परिवर्तन कला फौंडेशन, कोल्हापूर-चार लाख), तृतीय क्रमांक : द ग्रेट एक्स्चेंज (नगर अर्बन बँक स्टाफ, अहमदनगर-दोन लाख) संगीत नाट्य : प्रथम क्रमांक : संगीत संत गोरा कुंभार (राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी-दीड लाख), द्वितीय क्रमांक : संगीत मंदारमाला (देवल स्मारक मंदिर, सांगली-एक लाख), तृतीय क्रमांक : संगीत सन्यस्त खङग : (अमृत नाट्य भारती, मुंबई-पन्नास हजार)
संस्कृत नाट्य : प्रथम क्रमांक : वज्रवृक्ष : (इंद्रधनु कलाविष्कार संस्था, मिरज-एक लाख), द्वितीय क्रमांक : अनुबन्ध : (संस्कृत-प्राकृत भाषा विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे-साठ हजार), तृतीय क्रमांक : शशविषाणम् (सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर-चाळीस हजार).

सांगलीच्या कलाकारांचा सन्मान
या पारितोषिक वितरण सोहळ्यात कोल्हापूर व सांगलीतील गुणवंतांचाही सन्मान झाला. यामध्ये अभिनय गुणवत्तेसाठी सानिका आपटे, संकेत देशपांडे, सुरभी कुलकर्णी (जीवनक्रांती बहुउद्देशीय शेतकरी मंडळ, कोल्हापूर), उत्कृष्ट अभिनयासाठी सत्यजित साळोखे (परिवर्तन कला फौंडेशन, कोल्हापूर), अभिनय गुणवत्तेसाठी अथर्व काळे (श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली), शिवराज नाळे (हेल्पिंग बडीज फौंडेशन, सांगली), गायन गुणवत्तेसाठी श्रद्धा जोशी (देवल स्मारक मंदिर, सांगली), उत्कृष्ट अभिनयासाठी गंधार खरे (सस्नेह कला क्रीडा मंडळ, सांगली), आदींसह विजेत्यांचा गौरव केला.


Web Title: Pradhanu Kalavishkar of Miraje, State Deities in the state drama, 'Deval' in Sangli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.