कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेवरील वीजबिल २३ लाख रुपये थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र मंगळवारी थकबाकीतील पाच लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीने भरली आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववतपणे सुरू केल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारे हाल तात्पुरते थांबले आहेत.
ग्रामस्थांनी तातडीने पाणीपट्टी आणि घरपट्टी रक्कम भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार व सरपंच स्वप्नाली जाधव यांनी केले आहे. चालू व मागील वर्षातील वसुलीपोटी ग्रामस्थांकडून ३१ लाख ९१ हजार ४१३ घरपट्टी व २८ लाख १६ हजार पाणीपट्टी अशी ६० लाखांची रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला वीजबिल भरणे कसरतीचे होऊन बसले आहे.
त्यातच शासनाने यापूर्वी २०१८-१९मध्ये आठ महिन्यांच्या कालावधीत दुष्काळग्रस्त असणाऱ्या तालुक्यातील वीजबिले ही टंचाईग्रस्त निधीमधून भरण्याचे आश्वासन दिले होते. त्यामध्ये कामेरी गावचा समावेश होता. त्यामुळे ग्रामपंचायतीने या कालावधीतील वीजबिले शासन भरणार असल्याने ही रक्कम भरली नव्हती. मात्र कामेरी गावाला वारणा नदीवरून पाणीपुरवठा होतो. तांदूळवाडी येथे त्याचे वीज कनेक्शन आहे. मात्र तांदूळवाडी गाव दुष्काळी गावात येत नसल्यामुळे त्याचा लाभ कामेरी गावाला मिळाला नव्हता. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व वीज वितरणचे अधिकारी यांनी यामधील तांत्रिक अडचणी दूर केल्या असून, लवकरच ही रक्कम कामेरी ग्रामपंचायतला मिळेल, अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.