जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका जानेवारीत झाल्या आहेत. या निवडणुकीनंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. जत तालुक्यातील उमराणीतील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले आहे. तेथे अनुसूचित जातीचे आरक्षण पडणे आवश्यक होते, असे ग्रामस्थांचे मत होते. चुकीचे आरक्षण पडल्याने त्यांनी आरक्षण सोडतीविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
उमराणी येथील याचिका दाखल झाली असल्याने जत तालुक्यामधील ९ फेब्रुवारीरोजी होणाऱ्या सर्व सरपंच आणि उपसरपंच निवडीच्या प्रथम सभा तूर्त स्थगित केल्याचे आदेश काढले आहेत. या सभा घेण्याबाबतचे आदेश स्वतंत्र्यरित्या काढण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या आदेशामध्ये ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सरपंच निवडीबाबतच्या सभा १६ फेब्रुवारीपर्यंत न घेण्याबाबत आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील उर्वरित नऊ तालुक्यांमधील १३२ ग्रामपंचायतीमधील सरपंच व उपसरपंचाच्या निवडी दि. ९ फेब्रुवारीला होणार आहेत.