प्रसाद माळीसांगली : आपल्याला कोणी पाठवलेली पत्रे किंवा पार्सल पोस्टमन घरी आणून देतो. पण, आपल्याला पाठवायचे असेल तर पोस्ट कार्यालय गाठावे लागते. परंतु टपाल खात्याने नवी योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे घरबसल्या पोस्टाच्या वेब पोर्टलवर पत्र अथवा पार्सलची नोंदणी करायची व त्याचे ऑनलाइन पैसे भरायचे. त्यानंतर पोस्टमन घरी येऊन तुमचे पत्र अथवा पार्सल घेऊन जाईल. यामुळे पोस्ट कार्यालयाच्या रांगेत थांबण्याचा ताप कमी होणार आहे.टपाल विभागाने एपीटी २.० अर्थात ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी अंतर्गत ग्राहक पोर्टल सुविधा ४ ऑगस्ट पासून सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत तुमचे पत्र किंवा पार्सलची पोस्टाच्या वेबसाईटवरून नोंदणी करायची. त्यानंतर पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुमचे पत्र अथवा पार्सल घेऊन जाईल किंवा नोंदणीनंतर तुमचे पत्र अथवा पार्सल थेट पोस्टात जमा करायचे. जर तुमचे पार्सल ५०० रुपयांपेक्षा कमी मूल्याचे असेल तर पोस्टमन फक्त ५० रुपये सेवा शुल्क आकारेल.५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याचे पार्सल असल्यास कोणतेही शुल्क नसेल. ही सुविधा सामान्य ग्राहकांसह व्यावसायिक, इ-कॉमर्स करणारे, बॅंका, पतसंस्था यांच्यासाठी अधिक उपयोगी ठरत आहे. या पोर्टलद्वारे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ७५१ जणांनी नोंदणी करत पत्र, पार्सल पाठवले. तर आजअखेर १३०५२ लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला.
कशी करायची नोंदणी?पोस्टाच्या www.indiapost.gov.in या बेबसाईटवर जाऊन कस्टमर लाइन हा पर्याय निवडून पत्राची व पार्सलची नोंदणी करायची आहे. या साईटवर सामान्य ग्राहकांसाठी गेस्ट लॉगिनचा पर्याय आहे व व्यावसायिकांसाठी रजिस्टर लॉगिनचा पर्याय आहे. गेस्ट लॉगिनमध्ये ग्राहक स्पीड पोस्टद्वारे ३५ किलोपर्यंतचे पार्सल पाठवू शकतो. तसेच स्पीड पोस्टचा दर ४१ रुपयांपासून सुरू होतो. रजिस्टर पार्सलमध्ये २० किलो पर्यंतचे पार्सल पाठवू शकतो. रजिस्टर पार्सलचा दर ४२ रुपयांपासून सुरू होतो. व्यावसायिकांसाठी रजिस्टर कस्टमर लॉगिनमध्ये स्पीड पोस्ट व बिझनेस पार्सल असे पर्याय आहेत. स्पीड पोस्टमध्ये ३५ किलो व बिझनेस पार्सलमध्ये २ किलो पर्यंतचे पार्सल पाठवू शकतात. यामध्ये स्पीड पोस्टचा दर ४१ रुपयांपासून सुरू होतो व बिझनेस पार्सलचा दर ८० रुपयांपासून सुरू होतो. तसेच यामध्ये एकावेळी अनेक संख्येने पार्सल बुकिंग करता येऊ शकते.
ऑनलाइन भरा पैसेग्राहकाने पोर्टलवर आपले पार्सल ज्याला पाठवायचे आहे त्याचे नाव, पत्ता, पिनकोड व स्वत:चे नाव, पत्ता व पिनकोड भरायचे. त्यानंतर पार्सलची साईज व वजन भरल्यावर त्याची रक्कम तिथेच कळते. तसेच त्या रकमेचा क्यूआरकोड जनरेट होऊन ऑनलाइन पैसे भरता येतात. यासह तिथे सर्व माहितीचा तपशील व बारकोड तयार होतो. त्याची प्रिंट काढून पार्सलला जोडायची. त्यानंतर पोस्टमन येऊन तुमचे पार्सल घेऊन जातो.ग्राहक पोर्टल सुविधेचे फायदे
- घरबसल्या ऑनलाइन नोंदणी व घरातून पार्सल पोस्टमन घेऊन जाणार
- तुमच्या पार्सलचे ट्रॅ्क आणि ट्रेस सुविधेद्वारे लाइव्ह लोकेशन समजते.
- पार्सल पाठविण्याचा खर्च ऑनलाइन समजणार व ऑनलाइनच पेमेंट करता येणार
- व्यावसायिकांसाठी वॉलेट पेमेंटचा पर्याय यातून मासिक बिल जनरेट होते.
- तक्रार निवारणाची सोय उपलब्ध