सांगली : महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गर्दी व दाट वस्तीच्या ठिकाणी चाचण्यांच्या प्रमाणात वाढ करून खबरदारीच्या उपाययोजना केल्याने पॉझिटिव्हिटी दर घटल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
कापडणीस म्हणाले की, वीस दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांवर पोहोचला होता. ही चिंताजनक बाब होती. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी तातडीने अनेक उपाययोजना हाती घेतल्या. शहरात चाचण्यांचे प्रमाण पाचपटीने वाढवले. आधी दिवसाला ६०० ते ८०० चाचण्या केल्या जात होत्या. या चाचण्या ३ हजारांपर्यंत वाढवल्या. बाजारपेठा, झोपडपट्ट्या, दाट लोकवस्तीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले. या भागातील रहिवाशांच्या सामुदायिक चाचण्या केल्या. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी तीन पथके तैनात केली. सहाय्यक आयुक्तांची फिरती पथकेही कार्यरत होती. यातून २६ लाखांचा दंड वसूल झाला.
गृह अलगीकरणामधील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी २० प्रभाग समन्वयकांची नेमणूक करून दररोज ३०० ते ४०० गृहभेटी दिल्या. यामुळे महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट हा २० टक्क्यांहून ६.३६ टक्के इतका खाली आला. यामध्ये आरटीपीसीआरचा ७.१७ टक्के तर रॅपिड ॲन्टिजनचा रेट ५.५० टक्के इतका खाली आला आहे, असे कापडणीस म्हणाले.
चौकट
लसीकरणावर लक्ष
महापालिकेने लसीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. ३८ टक्के नागरिकांनी पहिला तर १४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महापालिकेचे एकूण १६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.
चौकट
कोट
महापालिका क्षेत्रात २० दिवसांपूर्वी जे गंभीर वातावरण होते ते कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. नागरिकांनी यापुढेही कोरोना त्रिसुत्रीचे पालन करावे. दुकाने सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी कामगारांची कोरोना तपासणी, लसीकरण करून घ्यावे. खबरदारीमुळे रुग्णसंख्येला आळा बसेल. - नितीन कापडणीस, आयुक्त