भिलवडी : वाचन संस्कृतीमधून सकारात्मक दिशा मिळून जीवनाला मूर्त स्वरूप प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी केले.
भिलवडी (ता. पलूस) येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावर विविध देणगीदार व गुणवंत वाचक सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
भिलवडी वाचनालयाची वाचक सभासद व सांगली पोलीस दलातील कॉन्स्टेबल सुधा मोरे हिला पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. भिलवडी वाचनालयात सातत्याने देणगी देणारे सेवानिवृत्त शिक्षक व बालसाहित्यिक ह. रा. जोशी, प्रा. महेश पाटील, संभाजी महिंद यांचा सत्कार करण्यात आला. भिलवडी वाचनालयाचा स्पर्धा परीक्षा विभाग मला विविध परीक्षांसाठी मार्गदर्शक ठरला असल्याचे मनोगत यावेळी सुधा मोरे यांनी व्यक्त केले. भिलवडी सार्वजनिक वाचनालयामुळे कृष्णाकाठावर वाचन संस्कृती रुजल्याचे मनोगत ह. रा. जोशी यांनी व्यक्त केले.
वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक केले तर शरद जाधव यांनी आभार मानले. यावेळी जी. जी. पाटील, डी. आर. कदम, रमेश चोपडे, सुनील भोसले, आदी उपस्थित होते.
फाेटाे : ०४ भिलवडी १
ओळ : भिलवडी (ता. पलुस) येथे सुधा मोरे हिचा सत्कार गिरीश चितळे यांनी केला. यावेळी जी. जी. पाटील, सुभाष कवडे, डी. आर. कदम आदी उपस्थित हाेते.