नेर्ले ते कापूसखेड इस्लामपूर हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. महामार्गाच्या पश्चिम बाजूकडील सर्व गावांतील ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करतात. गेल्या वर्षभरापासून कापूसखेड येथील ओढ्यावर क्रशसॅड घेऊन ओव्हरलोड डंपर नेर्लेमार्गे अहोरात्र वाहतूक करीत असतात. यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांना मात्र इस्लामपूरला जाताना रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. ग्रामपंचायतीने अनेकवेळा येथील माने गल्ली, बस स्टँड परिसरातील खड्डे मुरुमाने भरून घेतले; परंतु सततच्या डंपर वाहतुकीमुळे या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेेत. याबाबत ग्रामस्थ व वाहनचालकांच्या तक्रारी वाढू लागल्याने सरपंच रोकडे व संजय पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत डंपरचालकांना परत पाठविले. या रस्त्यावरून वाहतूक केल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला.
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटो : २२ नेर्ले १
ओळ : नेर्ले ते कापूसखेड रस्त्यावरून क्रशसॅडची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांना सरपंच छाया रोकडे, संजय पाटील, अनिल साळुंखे, कृष्णाजी माने यांनी राेखले.