लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : माधवनगर (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकाची दुरवस्था झाली आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे स्थानकाच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
माधवनगर येथील रेल्वे स्थानक इमारतीमधील खिडक्या, दरवाजे, फर्निचर, विद्युत साहित्य गायब झाले आहे. या रेल्वे स्थानकावर मद्यपान करणाऱ्यांचा नेहमीच राबता असतो. प्रेमीयुगुलांचादेखील वावर वाढला आहे. स्थानक परिसरात गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या परिस्थितीबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तरी त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
माधवनगर ही जुनी बाजारपेठ असल्याने आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे रेल्वे स्थानक उभारण्यात आले. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद या ठिकाणी जाण्यासाठी व्यापाऱ्यांना व प्रवाशांसाठी हे स्थानक उभारण्यात आले होते. मात्र याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली आहे.